जळगाव तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. यापैकी रविवारी दि. ५ रोजी १५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येत आहे. दुपारी १. ३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ४६ टक्के मतदान झाले असून जळगाव तालुका, पारोळा, धरणगाव येथे सर्वाधिक ५० टक्क्यांच्यावर मतदान झालेले आहे. अमळनेर तालुक्यात अमळगाव येथे गोंधळ उडाला होता. इतर ठिकाणी सध्या शांततेत मतदान सुरु आहे.
ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या मतदानासाठी लागणारे मतदान यंत्र, अधिकारी व पोलीस हे बंदोबस्तासाठी मतदान केंद्रावर पोचले होते. जिल्ह्यामधील १३ सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तर १९ सरपंचांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर ४७१ सदस्य हे बिनविरोध निवडले गेले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील चार ग्रामपंचायती बिनविरोध तर “संकटमोचक” मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. सर्वत्र मतदान घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायत या बिनविरोध निवडल्या गेलेल्या आहेत. यामध्ये भडगाव २, अमळनेर १, चाळीसगाव २, चोपडा २, जळगाव २, पारोळा २, यावल १, धरणगाव ४ ग्रामपंचायत बिनविरोध झालेले आहेत. जामनेर तालुक्यात २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. तर मुक्ताईनगर मध्ये १३ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहेत.
रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत जळगाव तालुक्यात सर्वाधिक ५६. १२, पारोळा ५४. ८१, धरणगाव ५०. २४, मुक्ताईनगर ४९. ८३, चाळीसगाव ४९. ८३, रावेर ४९. २३, पाचोरा ४८. ६५, भडगाव ४६. ४४, अमळनेर ४२. ४४, भुसावळ ४४. ०६, एरंडोल ३९. ३९, जामनेर ४६. ०५, चोपडा ३८. ९९, बोदवड ३९. ८९, यावल ४८. ४४ टक्के मतदान झाले आहे.