जळगाव शहरातील टॉवर चौकात ५० हजारांचा मुद्देमाल लंपास
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील टॉवर चौकातील जोगळेकर दुकानाच्यासमोर बसमध्ये चढत असताना महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघड झाली आहे. विशेष गोष्ट म्हणजे घटना घडली त्याच्या बाजूलाच शहर पोलीस स्टेशन आहे. पर्समधील सोन्याचा हार, मोबाईल आणि रोकड असे एकूण ५० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
संगीता रवींद्र राणे (वय-४६,रा.चोपडा) या महिला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान ब्युटीपार्लरसाठी लागणाऱ्या काही वस्तू घेण्यासाठी संगिता राणे या शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहरात आलेल्या होत्या. वस्तू घेतल्यानंतर त्या टावर चौकातील जोगळेकर दुकानाच्या समोर बसची वाट बघत होत्या. दरम्यान बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबवली.
या पर्समध्ये सोन्याचा हार, मोबाईल आणि रोकड असा एकूण ५० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान महिलेने तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल धांडे करीत आहे.