तीन दिवसात हजारो शेतकर्यांनी दिल्या भेटी; प्रक्रीया उद्योगासाठी मिनी दाल मिल, फवारणीसाठीचे ड्रोन, इलेक्ट्रिक बुल ठरतोय प्रदर्शनाचे आकर्षण
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकर्यांनी भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यासह धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, बर्हाणपूर आदी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. दरम्यान, प्रदर्शनाचा उद्या (सोमवार, दि.6) समारोप होणार असल्याने शेतकर्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त ठरणार्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अॅग्रोवर्ल्डच्यावतीने दि. 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान एकलव्य क्रीडा संकुल येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून प्रदर्शनात प्रक्रीया उद्योगासाठी मिनी दाल मिल, फवारणीसाठीचे ड्रोन, मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रिक बुल, मिल्कींग मशीन, प्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करणारे झटका मशीन यासांरखे वैशिष्ठ्यपूर्ण व अत्याधुनिक कृषी उपकरणांचे स्टॉल उपलब्ध आहेत. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, आनंद अॅग्रो केअर, मेट्रोजेन बायोटेक, कमलसुधा ट्रॅक्टर, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.
शेतकर्यांना दिशा देण्याचे काम अॅग्रोवर्ल्ड करतेय : अनिल भोकरे
शेतकर्यांनी नेहमी आशावादी राहीले पाहीजे. जगात सर्व मिळू शकते, परंतु आशा कुठेच मिळत नाही. कोणाकडून काय ज्ञान घेता येईल, यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. सध्याच्या काळात शेतकर्यांना सर्वाधिक गरज आहे ती, ध्यान, समयसूचकता आणि दिशादर्शकाची. आणि हे दिशा देण्याचे काम अॅग्रोवर्ल्ड करीत आहे, असे प्रतिपादन जळगाव कृषी विभागाचे सेवानिवृत्त कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी अॅग्रोवर्ल्ड पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले. राईज न् शाईनचे अमेय पाटील, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, मेट्रोजेनचे संचालक प्रियंक शहा, ऋचा शहा, प्लॅन्टो कृषी तंत्रचे निखील चौधरी, अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकर्यांचा सन्मान
प्रदर्शनात रविवारी (दि.5) देखील शेतकरी, शेतकरी गट, जोडव्यावसायिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अॅग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्काराने मनोज वायकोळे, भारती पाटील, सुनिता पाटील, राजश्री वानखेडे, सुरेश पाटील, सागर पाटील, नारायण सोनवणे, मयुरी पाटील, शंकर पाटील, अॅग्रोवर्ल्ड आदर्श गट शेती पुरस्काराने झाशीची राणी स्वयंसहायता महिला बचत गट, भूजल अभियान, रेणुका माता महिला शेतकरी गट, बळीराजा महिला शेतकरी गट, गुरुमाऊली महिला शेतकरी गट, राजे शेतकरी गट, श्री संत गजानन महाराज कापूस उत्पादक गट, अॅग्रोवर्ल्ड आदर्श जोड व्यवसाय पुरस्काराने गोपाल सपकाळे, समर्पित वाघ, राजेंद्र पाटील, समाधान पाटील यांचा तर अॅग्रोवर्ल्ड जलदूत पुरस्काराने सुनिल पाटील आणि तृषाल तायवाडे आदींचा सत्कार करण्यात आला.