शिवसेनेने दिला होता आंदोलनाचा इशारा, “केसरीराज” ने वेधले होते लक्ष
जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात युवासेना-शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचत निवेदन दिले होते. आता दोनच दिवसात काही समस्या मार्गी लागल्या आहे. सोनोग्राफी, एक्सरे मशीन, शस्त्रक्रिया गृह या सुविधांचे शनिवारी १५ जुलै रोजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते उदघाटन झाले. याबाबत डॉ. विनय सोनवणे यांचे कौतुक होत आहे.
जामनेरच्या शासकीय रुग्णालयात आज असंख्य समस्या आहेत. सोनोग्राफी मशीन नाही. एक्स-रे काढण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. रुग्णांची ओपीडी दिवसातून एकचं वेळा होते.रक्त तपासणी झाल्यानंतर वेळेवर रिपोर्ट मिळत नाही. उपजिल्हा रुग्णालय असून ब्लड बँक नाही. अपघात झाला तर हाडांचे डॉक्टर नाही. महिलांच्या तपासणीसाठी स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नाही. नेत्ररोग तपासणी साठी नेत्ररोग तज्ञ उपलब्ध नाही. स्वच्छता,वार्ड बॉय, ड्रेसर कर्मचारी उपलब्ध नाही, अशा अनेक समस्या या उपजिल्हा रुग्णालयात आहेत, अशी माहिती निवेदनाद्वारे शिवसेना ठाकरे गटाने दिली होती.
या समस्या शासन दरबारी मांडा व ८ दिवसाच्या आत सुविधा उपलब्ध करून सुरू करा. अन्यथा ८ दिवसाच्या नंतर भोंगळ कारभाराच्या विरोधात उपोषण करण्यासाठी बसणारं आहोत, असा इशारा देण्यात आला होता. “केसरीराज” ने याबाबत वृत्त प्रसारित केले होते. त्यानुसार डॉ. विनय सोनवणे यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. अवघ्या दोनच दिवसात सोनोग्राफी, एक्सरे मशीन उपलब्ध झाली असून शस्त्रक्रिया गृह अद्ययावत करण्यात आले आहेत. त्याचे उदघाटन जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. वैशाली महाजन, डॉ. प्रशांत महाजन यांच्यासह भाजप, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाचा विचार करून आता सुविधा उपलब्ध केल्या आहेत. काही सुविधांबाबत पाठपुरावा सुरु केला आहे. दर बुधवारी महिलांना सोनोग्राफी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. एक्सरे साठी २ तंत्रज्ञ उपलब्ध झाले आहे. तर २ स्त्रीरोगतज्ज्ञ देखील मिळाले असून गर्भपिशवीचे, सीझर व इतर शस्त्रक्रिया होणार आहेत. ब्लडबँकसाठी नाशिकला फाईल पाठवली आहे. लवकरच त्याबाबत मागणी पूर्ण होईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी दिली आहे.
तर युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे. रुग्णांना सुविधा मिळाल्यामुळे आता त्यांची इतर ठिकाणी होणारी पायपीट थांबणार असून निवेदनाची कृतिशील दखल घेतल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक यांचे आभार मानले आहे.