२ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त; पारधी-तारसोद बायपास परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत ६४.४४ ग्रॅम एमडीएमए (एम्फेटामाईन) अंमली पदार्थासह एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत अंमली पदार्थासह एक मोबाईल फोन असा एकूण २ लाख २३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पारधी-तारसोद बायपास परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित अजय बिरु गारो (रा. तांबापुरा, कंजरवाडा, मेहरूण, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६४.४४ ग्रॅम एमडीएमए अंमली पदार्थ आढळून आला. या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत २ लाख १३ हजार ३२० रुपये असून, सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण २ लाख २३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २२(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन संशयितांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गाविते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक सोनाम गोरे, पोलिस उपनिरीक्षक विजय देवऱ्या पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, अंमलदार तसेच तांत्रिक मदत पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, संशयास्पद हालचाली किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीसंदर्भात माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





