गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केला थरारक पाठलाग, सुमारे ८.८९ लाखांची रक्कम सुरक्षित
पाचोरा, ( प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराजवळील जारगाव येथे एसबीआयच्या एटीएममधील लाखो रुपयांची रक्कम लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. गुरुवारी पहाटे सुमारे ३.४५ वाजेच्या सुमारास जारगाव गावातील सारोळा रोडवरील एसबीआय एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांना याची माहिती मिळाली.


माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे व पोलीस कर्मचारी बंजारा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एटीएममधील रोकड असलेले कॅश कॅबिनेट काळ्या रंगाच्या क्रेटा (एमएच ४९ सीएस ७०२८) वाहनात चढविण्याच्या तयारीत तीन संशयित तरुण असल्याचे दिसून आले.
पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहनात बसून तारखेडा दिशेने पळ काढला. यानंतर पाचोरा पोलिसांनी आरोपींच्या वाहनाचा धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत थरारक पाठलाग केला. आरोपींचा माग काढण्यासाठी टोलनाके, धुळे पोलिस तसेच मध्यप्रदेशातील नियंत्रण कक्षांनाही तातडीने माहिती देण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित एटीएममध्ये तब्बल ८ लाख ८९ हजार ७०० रुपये इतकी रोकड होती. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे ही रक्कम सुरक्षित राहिल्याचे सांगितले जात आहे.
एटीएम तांत्रिक पथक अद्याप घटनास्थळी नाही
घटना उघडकीस आल्यानंतरही एसबीआयचे एटीएम तांत्रिक कर्मचारी व संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांचा तपास वेगात
घटनेनंतर परिसरात नाकाबंदी वाढविण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, वाहन क्रमांक आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.









