जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण-उत्सव, थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथींच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दिनांक १५ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या कालावधीत जिल्ह्यात शस्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड किंवा तत्सम वस्तू जमा करणे, सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह हावभाव करणे तसेच व्यक्तींच्या प्रतिमांचे दहन करणे यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार असून, विनापरवानगी सभा किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, हा आदेश शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ व प्रेतयात्रा यांना लागू नसून, तसेच कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही यातून सूट देण्यात आली आहे. हे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले आहे.









