एकाच वेळी धाडी टाकून ८ वाहने जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस दलाने अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली असून, सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ५५ लाख रुपये किमतीची ८ वाहने आणि ४२ हजार रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. २४ एप्रिल रोजी ४ वाहनांवर कारवाई केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता धरणगाव, जळगाव तालुका आणि एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी ही धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी एम.आय.डी.सी. पोलीस पथकासोबत संयुक्त कारवाई केली. या कारवाईत एकट्या एम.आय.डी.सी. परिसरातून ३ डंपर जप्त करण्यात आले आहेत.
अवैध वाळू वाहतूक करताना आढळलेल्या वाहनांवर बी.एन.एस. २०२३ आणि मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.









