**
अकरा कोटींची भरपाई घेतल्यानंतर कारवाई; शहर अभियंत्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद

जळगाव (प्रतिनिधी) :- गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या ॲटलांटा कन्स्ट्रक्शन (इंडिया) कंपनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला असून, या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीला १९९६-९७ ते २००१-०२ या कालावधीत डांबरीकरणासह विविध कामांसाठी तब्बल २५६ कार्यादेश देण्यात आले होते. या कामांसाठी कंपनीला २४ कोटी ३८ हजार ४८० रुपये ॲडव्हान्स देण्यात आला होता. त्यापैकी १९ कोटी ५५ लाख ५८ हजार ८६ रुपये कामाच्या मोबदल्यात वसूल करण्यात आले, तर उर्वरित ४ कोटी ७९ लाख ४२ हजार ३९४ रुपये २००१-०२ पासून थकीत राहिले होते.
महापालिकेने वारंवार नोटीस बजावूनही रक्कम न भरल्याने कंपनीने ११ जून २००५ रोजीच्या पत्राद्वारे थकबाकी मान्य केली होती. या थकीत रकमेवर महापालिका अधिनियमानुसार दरमहा ९ टक्के चक्रवाढ व्याज तसेच काम पूर्ण न केल्याबद्दल दररोज ५०० रुपये दंड आकारण्यात आला. यानुसार एकूण देय रक्कम तब्बल ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपये इतकी झाली आहे.
दरम्यान, अलीकडेच या कंपनीने महापालिकेविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करून ११ कोटी रुपयांची भरपाई मिळवली होती. या विरोधात नगरसेवक अरविंद देशमुख, ॲड. दिलीप पोकळे आणि ॲड. शुचिता हाडा यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयात त्रयस्थ अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निर्णय देत महापालिकेला ही रक्कम अदा करण्याचे आदेश दिले.
यानंतर नगरसेवक अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला कारवाई न झाल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर संबंधित यंत्रणेला कारवाईचे निर्देश देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ॲटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक राजू अंबालाल बाबरोट व इतर संचालकांविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४०९ व ४२० अंतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी करीत असून, एका बाजूला महापालिकेकडून ११ कोटी रुपये वसूल करणाऱ्या कंपनीवरच ४२ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा आरोप झाल्याने या प्रकरणाने मोठे राजकीय व प्रशासकीय वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.









