जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव, येथे मुला मुलींसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायालयातील वकील भारती कुमावत यांनी मोलाचे सहकार्य केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत मुला मुलींसाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस एक्ट २०१२ (पॉक्सो) कायदा ,केंद्र शासनाने बालकांच्या संरक्षणार्थ केला आहे. या कायद्याची माहिती देताना मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन वेगवेगळे सेशन घेण्यात आले. यामध्ये मुलींसाठी आपल्या शारीरिक, बौद्धिक मानसिक, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले. स्त्रियांवर आणि मुलींवर होणार्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. समाजात वावरताना मुलींनी आपले राहणीमान, वागवणूक कशी असावी याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले .स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी काय केले पाहिजे, योगा, ध्यानसाधना, व्यायाम करणे कसे गरजेचे आहेयाबद्दल योग्य मार्गदर्शन केले. घरात एकमेकांशी संवाद साधा, विचारांची देवाण-घेवाण करा, स्व संरक्षणासाठी लढा द्या, आत्मा सन्मान जपा हे सारे उद्देश्य डोळ्यासमोर ठेवायला सांगितले. गुड टच बॅड टच याबाबत विद्यार्थिनींना व्हिडिओ क्लिप दाखवून माहिती दिली . तसेच शाळेच्या कॉन्सलर (समुपदेशक) लीना चौधरी यांनी सुद्धा मुलींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य निलिमा चौधरी यांनी सुद्धा विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.