शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा उत्साह
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला.
महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला अधिष्ठाता कार्यालयात प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयातील विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर सकाळी विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीर रुग्णालयातील रक्तपेढीच्या मदतीने आयोजित केले होते. या शिबिरात प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी रक्तदान करून उत्साह वाढविला. एकूण ३८ जणांनी रक्तदान करून विधायक पद्धतीने जयंती साजरी केली.
यानंतर ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अनावरण करण्यात आले. या प्रतिमांना प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, अतिरिक्त अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. संजय बनसोडे, डॉ. विश्वनाथ पुजारी, समाजसेवा अधीक्षक बी. एस. पाटील यांची उपस्थिती होती.
शरीररचना शास्त्र विभागाच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यात ४ विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनाविषयी व कार्याबद्दल माहिती दिली. तसेच एकाने भीमगीत गायन केले. महाविद्यालयातील तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांसह डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.