जळगावात अजिंठा चौकातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) : गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीने जळगावच्या एका व्यापाऱ्याला ५ लाख २० हजार रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘एक लाखाचे पाच लाख रुपये करून देतो’ असे सांगून पाच अज्ञात भामट्यांनी व्यापाऱ्याच्या मुलाकडून रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

फिर्यादी जगदीश शंकर व्यास (वय ५८, रा. धानोरा, ता. चोपडा) हे व्यापारी आहेत. २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून ते २७ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजेच्या दरम्यान ही फसवणुकीची मालिका घडली. पाच अज्ञात आरोपींनी फिर्यादीला गाठून “एक लाखाचे पाच लाख रुपये परत मिळवून देतो” असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांचा मुलगा पंकज जगदीश व्यास (वय ३८) हा पैसे देण्यासाठी जळगाव शहरातील हॉटेल मुरली मनोहर (अजिंठा चौफुली) आणि हॉटेल कमल पॅराडाईज (भुसावळ रोड) परिसरात गेला होता.
संशयित पाच आरोपींनी साकेगाव हायवे जवळ कारमधून उतरून पंकज व्यास यांच्याकडून ५ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. “पैसे मोजून घेतो” असा बहाणा करत या टोळीने पंकज यांची नजर चुकवून रोख रकमेसह तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यास कुटुंबीयांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
जगदीश व्यास यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. साजीद मजीद मन्सुरी करीत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









