जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका महिलेसह तिच्या साथीदाराने ‘लकी ड्रॉ’ (भिशी) योजनेत मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेसह साक्षीदाराकडून तब्बल २० लाख ४८ हजार ५५ रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयुषी बुटवाणी (वय ३६, जळगाव) यांनी तक्रार दिली आहे. संशयित गीता दारा (रा. जळगाव) हिने सप्टेंबर २०२४ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत फिर्यादी व साक्षीदाराचा विश्वास संपादन केला.
आरोपीने ‘लकी ड्रॉ (भिशी)’ योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगून फिर्यादीकडून ४० हजार रुपये, तर साक्षीदाराकडून २० लाख ८ हजार ५५ रुपये असे एकूण २० लाख ४८ हजार ५५ रुपये रोख रक्कम व ऑनलाइन व्यवहारांद्वारे स्वीकारले.
भिशीची मुदत पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी व साक्षीदारांनी वारंवार पैशांची मागणी केली. मात्र आरोपीने रक्कम परत न करता टाळाटाळ केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करीत आहेत.








