बनावट शालार्थ घोटाळ्यात संजय गरुडांचा चुलतभाऊ जेरबंद

१६० कोटींच्या कथित घोटाळ्याचा तपास वेगात; दीपक गरुडला चार दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव | प्रतिनिधी
राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई करत शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांचा चुलतभाऊ दीपक काशिनाथराव गरुड (वय ५२) याला अटक केली आहे. शिरपूर तालुक्यातील विजासनी घाट परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष पथकाचा तपास आणखी व्यापक
नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्था, कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
८४१ नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात
तपासादरम्यान नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कोणताही वैध शालार्थ प्रस्ताव नसताना करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे.
आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी
चौकशीत मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे विशेष पथकाने विविध कागदपत्रांची पडताळणी केली. त्यातून दीपक गरुड यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. विजासनी घाट परिसरातून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून या काळात आर्थिक व्यवहार, बनावट शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया आणि या रॅकेटमधील इतर संबंधितांच्या भूमिकेचा तपास केला जाणार आहे.
या प्रकरणात तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, पुढील चौकशीत आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाच्या निधीच्या गैरवापराशी संबंधित हा घोटाळा राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गंभीर मानला जात असून, तपास पूर्ण होईपर्यंत आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.









