भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : इलेक्ट्रीक मोटारी चोरी करुन त्या भंगार विक्रेत्यास विकणा-या तिघा चोरट्यांना भडगाव पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारी विकून आलेले २ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
जिभाऊ दयाराम मोरे (वय २३), सोमनाथ उर्फ चेतन शिवराम मोरे (वय २३) आणि सतिष शांताराम मोरे (वय २८, तिघे रा. गुढे ता. भडगाव) अशी अटकेतील तिघा चोरट्यांची नावे आहेत. गुढे गावातील यशवंत भिला पाटील यांच्या शेतातील सुमारे ७ हजार रुपये किमतीच्या तिन इलेक्ट्रीक मोटारी चोरी झाल्या होत्या. या चोरीप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास सहायक फौजदार पांडुरंग सोनवणे करत होते. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुढे गावातील तिघांनी हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले.
तिघांनी गुन्हा कबुल केला आहे. तसेच चोरीच्या मोटारी त्यांनी भंगार विक्रेत्यास विकल्याचे देखील कबुल केले. मोटारी विकून आलेले २ हजार ७०० रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यचा पुढील तपास स. फौ. पांडुरंग सोनवणे, स.फौ. अनिल अहिरे, पोहेकाँ निलेश ब्राम्हणकार, पोना. एकनाथ पाटील, पोकाँ सुनिल राजपुत यांनी केला.