
जळगाव ( प्रतिनिधी ) – थोर समाजसुधारक, शिक्षणाचे प्रणेते, स्त्री शिक्षणाचे अग्रदूत आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अयोध्या नगर येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्था, अयोध्यानगर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या वंदना इंगळे यांच्या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी बोलताना उद्योजक संतोष इंगळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि विषमतेविरुद्ध लढा देत महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार रुजवला. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते शेतकरी, वंचित आणि शोषितांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यापर्यंतचे त्यांचे कार्य सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समतेवर आधारित समाजव्यवस्थेचा विचार दिला.
महात्मा फुले यांनी पेटवलेली परिवर्तनाची ज्योत राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेली. फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार हीच सामाजिक न्यायाच्या लढ्याची खरी प्रेरणा असून, समाजातील शेवटच्या घटकाला न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या अभिवादन कार्यक्रमाला नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या वंदना इंगळे, संस्थेचे अध्यक्ष नंदू पाटील, सचिव सुभाष माळी, उद्योजक संतोष इंगळे यांच्यासह वसंत महाजन, गोपाळ महाजन, दिलीप बागुल, प्रवीण चौधरी, हेमंत महाजन, ज्ञानेश्वर माळी, प्रमोद थोरात, शंकर महाजन, संकेत चौधरी, सुरेश माळी आणि हर्षल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.







