शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या बॅचचा सन्मान सोहळा
जळगाव (प्रतिनिधी) : देशसेवेसाठी डॉक्टर तयार होताना त्याच्या घडणीत पालकांचे, मित्रांचे, शिक्षकांचे महत्वाचे योगदान आहे. डॉक्टरसुद्धा सैनिका सारखा लढवय्या असतो. तो देशात लोकांचे जीव वाचविण्याचे काम करित असतो. पदवी सर्वकाही नसते. डॉक्टरला आयुष्यभर शिकावेच लागत असते. नवीन वैद्यक संशोधन, तंत्रज्ञानबाबत डॉक्टरांना अवगत करून घ्यावे लागत असते. विद्यार्थ्यांनी त्यासाठी कायम सज्ज राहावे, असे मार्गदर्शन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट डॉ. माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना केले. समाजानेही डॉक्टरांना समजून घेत त्यांच्याविषयीं कृतज्ञ भावना ठेवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पहिल्या बॅचचा आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पार पडला. यावेळी ऑनलाइन मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. कानिटकर ह्या बोलत होत्या. प्रसंगी मंचावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर), उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले (पदवीपूर्व), वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रास्ताविकामध्ये अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी प्रथम बॅचचा आढावा घेऊन, ही बॅच यशस्वीरित्या निपुण वैद्यकीय कौशल्य घेऊन आता सामाजिक क्षेत्रात जाणार असल्याबाबत अभिमान व्यक्त केला. रुग्णसेवा करताना सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांनी जपावी असेही त्यांनी आवाहन केले.
यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणींचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी व रोजगाराकरिता सदिच्छा दिल्या. रुग्ण सेवा करताना डॉक्टरांना दडपण असते. मात्र समर्पित भावनेने काम करताना डॉक्टर हे रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यात यशस्वी असतात असेही आयुष प्रसाद म्हणाले.
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुष्यात नक्कीच आपल्याला आपली ध्येय गाठायची आहेत. मात्र ही ध्येय गाठताना आपला विवेक शाबूत ठेवून व उत्कृष्ट माणूस म्हणून आपली समाजात प्रतिमा टिकून राहिली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्र हे आव्हानात्मक आहे. पण आपल्यामुळेच अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याचे काम होते. खरे तर ही देशसेवा आहे आणि या देशसेवेला आपण समर्पित झालो पाहिजे असे मत डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.
प्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांचा व्हिडिओ संदेश यावेळी प्रसारित करण्यात आला. यानंतर यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांना निस्वार्थी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचा लोगो असलेले टपाल तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ. अब्दुल राफे आणि डॉ. आस्था गणेरीवाल यांनी केले. तर आभार डॉ. विजय गायकवाड यांनी मानले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक या हृद्य सोहळ्याला पाहण्यासाठी देशभरातून आलेले होते. यावेळी महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते. सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांनी परिश्रम घेतले.
अश्रुपूर्ण, भावपूर्ण सोहळ्यात पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थी भावुक
विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये त्यांचे पालक देशभरातून विविध गावावरून आलेले होते. आपल्या मुलाचा सन्मान होत असल्याचे पाहून त्यांना भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गेल्या पाच वर्षात वैद्यकीय शिक्षण घेण्यासोबत प्रशिक्षण देखील जळगाव येथे विद्यार्थ्यांनी पूर्ण केले. या पाच वर्षांच्या आठवणीने विद्यार्थ्यांना गहिवरून व दाटून आले होते. अनेक विद्यार्थी तर ग्रामीण भागातून प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांच्या पालकांना अभिमान दाटून येत होता.