जळगावातील खंडेराव नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दारुच्या नशेत दरवाजा लाथा मारीत असलेल्यांना जाब विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास खंडेराव नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खंडेराव नगरात वैभव हरीलाल सोनार हे वास्तव्यास आहेत. दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा वैभव अशोक वडतकर हा दारुच्या नशेत त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास वैभव वडतकर हा दोन अनोळखी इसमांसह वैभव सोनार यांच्या घरी येवून त्यांना शिवीगाळ करीत होते. यावेळी त्याने काल रात्री तुम्ही माझ्याशी का भांडण केले, आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्यांनी वैभव सोनार व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी वैभव सोनार यांचा भाऊ राहुल सोनार हा त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आला असता, वैभव वडतकर याने त्याठिकाणी पडलेला दगड दोघांच्या डोक्यात टाकून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघेही मारेकरी तेथून पसार झाले.
वैभव सोनार हे तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिसात आले असता, त्यांना पोलिसांनी मेडीकल मेमो देवून उपचारासाठी रवाना केले. उपचार घेतल्यानंतर वैभव सोनार यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.