मुलगी पळवून नेण्यास मदत केल्याच्या संशयावरून तरुणावर कड्याने हल्ला


यावल पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल
यावल (विशेष प्रतिनिधी): संशयित आरोपीच्या चुलत बहिणीने दुसऱ्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून, “तूच तिला पळवून नेण्यास मदत केलीस” असा संशय घेत एका २० वर्षीय तरुणाला चौघांनी संगनमत करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावल येथील बस स्टँडसमोर ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ही हिंसक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अकिल शावखाँ तडवी (वय २०, व्यवसाय- मजुरी, रा. परसाडे, ता. यावल) हे जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल बस स्टँडसमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीत नाचत होते. त्यावेळी संशयित मोसीम मेहबूब तडवी याने अकिल यांच्याकडे जात, “तू माझ्या चुलत बहिणीला पळून जाण्यास मदत केलीस,” असा आरोप करत शिवीगाळ सुरू केली.
यानंतर समीर हबीब तडवी, तय्यब रुबाब तडवी आणि आदिल राजू तडवी (सर्व रा. परसाडे, ता. यावल) यांनी अकिल यांना घट्ट पकडून ठेवले, तर मोसीम तडवी याने आपल्या हातातील लोखंडी कड्याने अकिल यांच्या डोक्यात कपाळाजवळ जोरात मारून गंभीर दुखापत केली. तसेच इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या प्रकरणी अकिल तडवी यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:४९ वाजेच्या सुमारास मोसीम मेहबूब तडवी, समीर हबीब तडवी, तय्यब रुबाब तडवी आणि आदिल राजू तडवी या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. २९३/२०२६). या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक वसीम तडवी करत आहेत.









