कोळन्हावीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

मागील दरवाजाचे कडी-कोंडे तोडून प्रवेश; एक लाखाचा ऐवज चोरीला
यावल, प्रतिनिधी : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कडी-कोंडे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या खोलीचे दार तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळन्हावी येथील रहिवासी भूषण वासुदेव सोळंके हे कुटुंबासह घरातील पुढील खोलीत झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील दुसऱ्या खोलीचे दार तोडून कपाटातील ९४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि सहा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घरफोडीचा प्रकार लक्षात येताच यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी आणि किशोर परदेशी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच चोरट्यांचे पुरावे मिळविण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी आणि किशोर परदेशी पुढील तपास करीत आहेत.









