ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तांब्याची तार चोरी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून १० किलो वजनाची सुमारे १० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनसगाव ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून फिर्यादी व मनोज कुंभार यांच्या संमतीशिवाय आरोपींनी संगनमत करून १० किलो वजनाची तांब्याची तार चोरल्याचा आरोप आहे. चोरी करत असताना आरोपी मिळून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ईश्वर अंकुश पाटील (वय २८, व्यवसाय शेती, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात रोहित संजय बोदडे, आकाश एकनाथ सोनवणे, अजय विश्वास खरोडे, रोशन रमेश सपकाळे (सर्व रा. सुनसगाव, ता. भुसावळ), तसेच अजीज आजाद खाटीक आणि हर्षद शरीफ खाटीक (दोघे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/२८८९ धिरज जनार्दन मंडलिक करीत आहेत.








