घरात घुसून कपाट फोडण्याचा प्रयत्न; तरुणाला पकडले

चोरीचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले
जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील एका घरात अनधिकृतपणे प्रवेश करून कपाट उघडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला घरातील व्यक्तींनी पकडल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निहाल दिनेशकुमार हसिजा (वय ३१, व्यवसाय, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांच्या घरी २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास साहिल सद्दाम शहा (वय २१, रा. तांबापुरा, जळगाव) याने अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या घरातील कपाट उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, घरातील व्यक्तींना प्रकार लक्षात आल्याने आरोपीला पकडण्यात आले. फिर्यादी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपीने, “तुम्ही तक्रार दिली तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९८/२०२६ अन्वये चोरीचा प्रयत्न व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ./१२४८ पंकज पाटील करीत आहेत.









