वाळू टाकण्याच्या वादातून दुकानमालकासह तिघांवर जीवघेणा हल्ला
जळगाव | प्रतिनिधी : शहरातील आशा नगर, सुप्रीम कॉलनी परिसरात दुकानासमोर वाळू टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी दुकानमालकासह तिघांवर लाकडी दांडके व लोखंडी आव्हाडाच्या साहाय्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना २० ऑगस्टच्या रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.


दुकानासमोर वाळू टाकण्यावरून वाद
फिर्यादी सुरेश रामप्रसाद पांडे (वय ५२), रा. पांडे किराणा, भगवा चौक, सुप्रीम कॉलनी, जळगाव हे किराणा दुकान चालवितात. त्यांच्या दुकानासमोरील जागेत आरोपी अमीन शब्बीर पटेल हा घराचे बांधकाम करीत असून तेथे वाळू टाकल्याने सुरेश पांडे यांनी त्यास वाळू टाकण्यास मनाई केली होती. याच कारणावरून १९ ऑगस्ट रोजी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता.
‘गाडी काढ, नाहीतर जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी
त्यानंतर २० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पांडे यांच्या दुकानासमोरील एमएच १९ सीएफ २१५६ क्रमांकाच्या ओमनी कारची काच फुटलेली दिसून आली. त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कारची काच कोणी फोडली याबाबत विचारणा करण्यासाठी सुरेश पांडे हे दुकानाजवळ गेले. त्यावेळी अमीन पटेल, त्याचा मुलगा दानिश पटेल, मोहम्मद पटेल आणि शोएब चौधरी यांच्यासह अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी पांडे यांच्याशी वाद घालत मारहाणीची धमकी दिली.
लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्याराने मारहाण
यानंतर आरोपींनी बांधकामाच्या ठिकाणी पडलेले सेंट्रिंगचे लाकडी दांडे व लोखंडी सळी घेऊन पांडे व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींवर हल्ला केला. अमीन पटेल याने लोखंडी आव्हाडाने सुरेश पांडे यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच दानिश पटेल याने लाकडी दांडक्याने पांडे यांच्या मुलगा सौरभ याच्या डोक्यात व उजव्या कानावर मारहाण केली.
तिघे जखमी
या हल्ल्यात सौरभसह अन्य एक व्यक्ती निखिल यालाही मारहाण करून जखमी करण्यात आले. निखिलच्या तोंडाला दुखापत होऊन दात पडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित इतर काही व्यक्तींनी दगडफेक करून दुखापत केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
चार आरोपी अटकेत
या प्रकरणी सुरेश पांडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 118(1), 115(2), 189(2), 191(2), 191(3) व 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमीन शब्बीर पटेल (वय ५२), दानिश अमीन पटेल (वय २६), मोहम्मद अमीन पटेल (वय २७) आणि शोएब याकूब चौधरी (वय २७) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक काळे तपास करीत आहेत.









