अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी अमळनेरात पतीविरोधात गुन्हा दाखल


प्रेमविवाहानंतर गरोदर राहिलेल्या मुलीच्या उपचारादरम्यान उघड झाला प्रकार; ‘पॉक्सो’अंतर्गत कारवाई
विशेष प्रतिनिधी
जळगाव : अमळनेर तालुक्यातील एका १५ वर्षे ६ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पतीविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचा सुमारे वर्षापूर्वी अजय कैलास अहिरे (रा.ता. अमळनेर) याच्याशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही पती-पत्नीप्रमाणे सासरी एकत्र राहत होते.
दरम्यान, मुलगी गरोदर राहिली. गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात (९ ऑगस्ट २०२६ रोजी) पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने पालकांनी तिला धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले.
वैद्यकीय माहिती व कायदेशीर तरतुदींच्या आधारे अमळनेर पोलीस ठाण्यात २१ ऑगस्ट रोजी गुन्हा क्रमांक ४३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम ६४, ६५(१) सह पॉक्सो (POCSO) कायद्यातील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








