रेल्वे पुलावरून बोरी नदीत पडल्याने कामगाराचा मृत्यू

अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर येथील बोरी नदीवरील रेल्वे पुलावर रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना पुलावरून खाली नदीत पडल्याने एका रेल्वे कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
मयत कामगाराचे नाव उदय शिवाजी बोरसे (रा. नंदुरबार) असे आहे. ते रेल्वे विभागाकडून बोरी नदीवरील पुलावर रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू असतानाच त्यांचा तोल जाऊन ते पुलावरून थेट नदीत कोसळले.
घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने बाहेर काढून अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती स्टेशन प्रबंधक विकास पाटील यांनी दिल्यानंतर सुनील गव्हाणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.









