जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरसोली येथील घटना ;कायदा सुव्यवस्था ढासळली

जळगाव : प्रतिनिधी शिरसोली गावातील जुन्या भांडणाचा राग मनात धरून दापोरा येथील एका तरुणासह त्याच्या मित्रांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची आणि चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २६ जून रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र. न. स्मशानभूमीजवळ घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी विशाल विनोद पाटील (वय २१, रा. दापोरा, ता. जि. जळगाव) या तरुणाने रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी (सर्व रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
फिर्यादी विशाल पाटील हा सुप्रीम कंपनीत मजुरीचे काम करतो. २६ जून रोजी रात्री तो त्याचे मित्र रोशन मधुकर लांबोडे आणि ललित ज्ञानेश्वर भोई यांच्यासोबत रोशनच्या पल्सर मोटारसायकलने (क्र. MH 19 EM 9295) शिरसोलीवरून दापोरा येथे जात होता. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शिरसोली स्मशानभूमीजवळून जात असताना संशयित विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी यांनी त्यांना रस्त्यात अडवले.
२५ जून रोजी रात्री गावात दर्शन देवरे, रवी मिस्तरी आणि मयुर भोई, प्रेम सोडव यांच्यात झालेल्या भांडणात तुम्ही देखील होतात, अशी कुरापत संशयितांनी काढली. त्यांनी विशाल आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान संशयित दीपक भिल याने त्याच्याजवळील चॉपरने विशाल पाटील याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि कोपरावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच तिघांना जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यानंतर विशाल आणि त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढत गावातील शुभम सोनवणे याला फोन करून बोलावून घेतले. शुभमने जखमी विशालला तातडीने जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणीएमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








