अजिंठा चौफुलीवरील अपघात; एमआयडीसी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – अजिंठा चौफुली येथे भरधाव कंटेनरने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बानुबी कासम पिंजारी (वय ६०, रा. एमआयडीसी, फातिमानगर, जळगाव) या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अजिंठा चौफुली येथे हा अपघात झाला. फिर्यादी त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एमएच १९ डीवाय ३८९६ वरून त्यांची आई बानुबी कासम पिंजारी यांना मागे बसवून बसस्टँडकडे जात होते.
यावेळी भुसावळकडून येणाऱ्या एनएल ०१ एजी ५७२९ क्रमांकाच्या कंटेनरचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत फिर्यादीच्या मोटारसायकलला मागून धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत बानुबी पिंजारी या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या. त्याचवेळी फिर्यादी हेही रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी बानुबी पिंजारी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फिर्यादीच्या जबानीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालकाची माहिती उपलब्ध नसल्याचे नोंदीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/१९३४ गजानन बडगुजर, एमआयडीसी पोलिस ठाणे, जळगाव करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नसल्याचे नोंदीत नमूद आहे.









