मुंबईचे प्रा.डॉ. मिलिंद नवलखे यांचे प्रतिपादन
शासकीय महाविद्यालयातर्फे विशेष परिषदेचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – कर्ण रोपण तंत्रज्ञान म्हणजेच कोंक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे. ज्याच्या सहाय्याने कर्णबधिर व्यक्तीस आवाज ऐकणे शक्य होऊ शकते. ज्या व्यक्तीस श्रवणयंत्र फायदेशीर नसते त्या व्यक्तीस कोंक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या हे आवाज ऐकवण्याचे काम करते. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ही जन्मजात बहिरेपणा असलेल्या बालकांसाठी वरदान ठरते. यात ठार बहिरेपणासह जन्मलेले मूल ऐकू लागते, बोलू लागते आणि सर्वसामान्य मुलांप्रमाणे आत्मविश्वासाने आयुष्य जगू लागते, अशी माहिती मुंबई येथील केईएम रुग्णालयाचे प्रा. डॉ. मिलिंद नवलखे यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कान-नाक-घसा विभागातर्फे दोनदिवसीय “कोंक्लिअर इम्प्लांट ऍडव्हान्सेस” हि परिषद घेण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नवलखे यांनी प्राध्यापक, डॉक्टर्स, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. उदघाटन प्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. अक्षय सरोदे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून उदघाटन केले.
प्रस्तावनेतून सहायक प्रा. निशिकांत गडपायले यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देऊन उद्देश सांगितला. त्यानंतर डॉ. अक्षय सरोदे यांनी सांगितले की, ज्या व्यक्तींना व मुलांना ऐकायला व बोलायला येत नसेल तर त्यांची तपासणी करून कर्णयंत्र लावायला हवे किंवा कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करायला हवी. त्यानंतर बोलण्याचे उपचार करायला हवे, असे सांगून त्यांनी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियाचे महत्व सांगितले. वाचा तज्ज्ञ डॉ. राजश्री वाघ यांनी, लवकर निदान, लवकर उपचार केल्यास बोलण्याची समस्या दूर होते. जर बाळाला ऐकू येत नाही, आवाजाला प्रतिसाद देत नाही तर अशा बालकांना भाषा शिकण्याच्या कालावधीत उपचार करावे लागतात. विशेष करून ३ वर्षांखालील बालकांना उपचार केल्यावर ते व्यवस्थित ऐकू व बोलू शकतात, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते डॉ. मिलिंद नवलखे म्हणाले की,कोंक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया खर्चिक असली तरीही जीवनदायी ठरते. शासकीय रुग्णालयांमध्ये कमी खर्चात होते. शस्त्रक्रियेनंतर विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यानंतरच या शस्त्रक्रियेचा उपयोग होतो, असे डॉ. नवलखे म्हणाले. शस्त्रक्रिया कशी केली जाते ते सांगून डॉ. नवलखे यांनी केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली. कान नाक घसा तज्ञ तथा अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विभागातील डॉ. विनोद पवार,डॉ. ललित राणे, ऑडिओलॉजिस्ट मुनज्जा शेख यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दिव्या बुजाडे हिने तर आभार सार्थक सेन याने मानले. ऋतुजा खांडेकर, अमन गुप्ता, स्वप्नजा कसारे, ओंकार पवार आदींनी परिश्रम घेतले.