जळगाव शहरातील एमआयडीसी येथील गोदाम फोडले
जळगाव (प्रतिनिधी) : बंद असलेल्या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीचा पापड मसाला चोरून नेला. ही घटना २४ ते २६ मार्चदरम्यान औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. त्यात तीन जण चोरी करताना दिसत आहेत.ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी गोदामाजवळ येऊन वीजपुरवठा खंडीत केला. त्यानंतर अंधारामध्ये त्यांनी चोरी केली. अतुल विश्वनाथ मुळे (५९, रा. मोहाडी रोड) यांचा मसाल्याचा व्यवसाय असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे ते स्टॉकीस्ट आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील एम सेक्टरमध्ये त्यांचे श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोदाम आहे. त्यात ते पापड मसाल्यासह इतरही मसाले ठेवतात.
दिनांक २४ ते २६ मार्चदरम्यान या गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी गोदामातून ८ लाख ३५ हजार १०२ रुपये किमतीच्या पापड मसाल्याच्या पुड्या असलेल्या ७१ गोण्या चोरून नेल्या. या प्रकरणी अतुल मुळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.