शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू आहेत उपचार
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुभाषवाडी येथील ग्रामस्थांना शेतात काम करीत असताना सापाने चावा घेतल्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोघेही ग्रामस्थांनी ज्या सापाने चावा घेतला त्या सापाचे डोके धरून जिवंतपणे रुग्णालयात आणल्यामुळे रात्री ८ वाजता एकच खळबळ उडाली होती.
सुभाष वाडी येथे जोरसिंह राठोड (वय ४२) आणि बळीराम जाधव (वय ५०) हे दोघेजण काम करीत असताना त्यांना नकळतपणे सापाने चावा घेतला. त्यांना ते लगेच लक्षात आले. त्यांनी तातडीने सापाचे डोके धरून वाहन करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. यावेळी जिवंत साप हातात धरून आणल्यामुळे सुरक्षारक्षकासह डॉक्टर, परिचारिका आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली.
दरम्यान, त्या सापाला सुरक्षारक्षकांनी पिवळ्या रंगाच्या कचऱ्याच्या थैलीमध्ये भरून सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी बांधून ठेवले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर व डॉ. संदीप पाटील यांनी त्यांना तपासून तातडीने अतिदक्षता विभागात घेतले. तेथे क्रमांक एक कक्षामध्ये भिषक डॉ.विशाल अंबेकर, डॉ. प्रसाद खैरनार यांनी त्यांना तपासून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या इतर तपासण्या देखील करण्यात येत आहेत. दोघांना कक्ष क्रमांक ९ मध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्प मित्रांला बोलवून साप त्याच्या ताब्यात देण्यात आला.