जळगाव ( प्रतिनिधी ) – चिन्या जगताप हत्याकांडातील साक्षीदार व सध्या नाशिकच्या किशोर सुधारालयात कारागृह शिपाई या पदावर कार्यरत असलेले मनोज जाधव यांनी जबाब नोंदविण्यास जळगावात येण्यास नकार दिल्याने किशोर सुधारालयाच्या प्राचार्यांनी तशी माहिती देणारे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठवले आहे . या हत्याकांडातील आरोपी असलेले अधिकारी आणि कर्मचारी दीड महिन्यांपासून फरार आहेत आणि ते जळगाव परिसरातील रहिवाशी असल्याने आपल्या जीविताला येथे आल्यावर धोका होऊ शकतो अशी भीती साक्षीदार मनोज जाधव यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे
मनोज जाधव यांनी किशोर सुधारालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , जळगाव पोलिसांनी जबाबासाठी हजर राहण्याबाबत दिलेले पत्र १० जानेवारीरोजी मनोज जाधव यांना मिळाले आहे . जळगांव जिल्हा कारागृह येथे सप्टेंबर 2020 मध्ये कार्यरत असतांना या कारागृहात न्यायाधीन बंदी नामे चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप याचा न्यायालयीन कोठडीत येथील अधिकारी व कर्मचारी यांचे मारहाणीत मृत्यु झाला होता . या गुन्ह्याच्या तपासात ते प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे त्यांचा इन कॅमेरा व लिखित स्वरुपात आणि पोलीस संरक्षणात जबाब घेण्यात आला होता चिन्या जगतापच्या पत्नीने गुन्हा दाखल होत नसल्याने उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली होती न्यायालयाचे आदेशान्वये पोलीस स्टेशन नशिराबाद यांनी उशिराने चौदा महिन्यानंतर 30. नोव्हेंबर 2021 रोजी भा.द.वि. कलम 302, 143, 147,
201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलीस स्टेशन नशिराबाद यांनी पत्र ( क्र 1602/2021 दिनांक 26.11.2021 नुसार ) कलम 160 प्रमाणे नोटीस देवून 27. नोव्हेंबर 2021 रोजी मनोज जाधव यांचा जबाब नोंदविलेला आहे.आजपर्यंत न्यायालयात तसेच पोलीस स्टेशनकडे तीन वेळेस त्यांच्या जबाबाची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होवून दिड महिना उलटुनदेखील आजपर्यंत दोषींवर कारवाई झालेली नाही. दोषी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब संशयास्पदरित्या कर्तव्यावरुन फरार झाले आहेत , असे असतांना मला वारंवार आपणाकडे जबाबासाठी बोलावले जात आहे. आरोपी जळगांव परीसरातील असुन ते सर्व फरार असल्याचे कळल्याने मी भयभित असुन, माझे जिवितास धोका निर्माण झालेला आहे. माझे संरक्षणाचा विचार करुन उच्च न्यायालय यांनी मला पोलीस संरक्षण देणेबाबतदेखील विचारणा केलेली आहे. पुन्हा चौथ्या वेळेस जबाब घेणे आवश्यक असल्यास, माझा सुरक्षेचा विचार करुन माझा जबाब नाशिक येथे येवून कर्तव्याचे ठिकाणी नोंदविण्यात यावा अथवा नाशिक पोलीसांमार्फत नोंद करण्यात यावा अशी विनंती मनोज जाधव यांनी त्यांच्या वरिष्ठांना आणि जळगाव पोलिसांना केली आहे . .