धक्कादायक, चोपडा तालुक्यात हनी ट्रॅप…तरुणाकडून उकळले ४ लाख !
नग्न विडिओ बनवून व्हायरल करण्याची तरुणीची धमकी
जळगाव (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणावर ‘हनी ट्रॅप’ करण्यात एक तरुणी यशस्वी झाली. या तरुणाचे नग्न विडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून वेळोवेळी विविध खात्यावरून ४ लाख ९ हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यात एका गावात हा तरुण शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला त्याच्या गावी असताना २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर रोजी एका मोबाईल नंबरवरुन अज्ञात २७ वर्षीय तरुणीने फोन करून सलगी वाढविली. त्यानंतर तरुणाच्या व्हाट्सवर फोन करण्यास सुरुवात केली. एका दिवशी तर या तरुणाला कपडे काढून नग्न होण्यास सांगितले. तरुणीच्या गोड बोलण्याला भुलून त्याने नग्न होताच त्या तरुणीने त्याचे विडिओ बनविले. नंतर विडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विविध बँक खात्यातून त्याच्याकडून वेळोवेळी ४ लाख ९ हजार ५०० रुपये मागून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने अडावद पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनात फिर्याद दाखल करण्यात आली असून तपास पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर करीत आहेत.