बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास


चाळीसगाव शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वृद्धाच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना चाळीसगाव बसस्थानकावर घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, धनराज पांडुरंग मोरे (वय ७३, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) हे सेवानिवृत्त बसचालक आहेत. १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता ते चाळीसगाव बसस्थानकावरून मालेगाव येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते.यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चलाखीने काढून लंपास केली. या सोन्याच्या चैनची अंदाजे किंमत ६५ हजार रुपये आहे.
चोरीची घटना लक्षात आल्यानंतर धनराज मोरे यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय मालचे करीत आहेत.









