भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील साकेगाव शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी कारचे टायर फुटल्याने कार पलटी होऊन चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकी समाधान भोई ( वय – ४ ) रा. आव्हाणे, ता.जि.जळगाव असे मयत बालकाचे नाव आहे.
समाधान चंद्रभान भोई (वय-३२) हे आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात राहायला आहे. दरम्यान २६ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता समाधान भोई हे त्यांचा मुलगा लकी भोई आणि चालक चंद्रभान शिवाजी भोई असे सर्वजण कार क्रमांक (एमएच ०३ बीडब्ल्यू ४८६१) ने कामानिमित्त जळगावहून भुसावळकडे निघाले होते. भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील बालाजी पेट्रोल समोरून जात असतांना अचानक त्यांच्या कारचे टायर फुटल्याने कार पलटी होवून मोठा अपघात झाला. यात चार वर्षाचा बालक लकी भोई याचा जागीच मृत्यू झाला होता. तर चालक चंद्रभान भोई आणि समाधान भोई हे जखमी झाले होते. बालकाच्या मृत्यू प्रकरणी अखेर तीन महिन्यानंतर शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चालक चंद्रभान भोई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजय भोई करीत आहे.