अमळनेर बस्थानकातील प्रकार
अमळनेर (प्रतिनिधी):- अमळनेर बसस्थानक आवारात गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगळपोत चोरणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पनाबाई अशोक शिंपी (वय ६५, रा. शिरूड, ता. अमळनेर) या ९ जून रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर बसस्थानकातून बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीची, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत लंपास केली.
या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित महिलांचा शोध घेतला. तपासादरम्यान शारदा सुनील कसबे (वय ३५) आणि माया श्रावण कांबळे (वय ५५) या दोघींना ताब्यात घेण्यात आले. दोघीही धुळे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितीन मनोरे हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.









