बोरी नदीपात्रावर पोलिसांचा पहाटेचा छापा; अवैध वाळू वाहतुकीचे सहा ट्रॅक्टर जप्त
हिंगोणे परिसरातील धडक कारवाई; सहा चालक ताब्यात, वाहन मालकांविरुद्धही कारवाईची तयारी
अमळनेर | प्रतिनिधी

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात अमळनेर पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोठी कारवाई करत बोरी नदीपात्रातून वाळूची वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केले. या कारवाईत सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले असून, संबंधित वाहनांच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मंगळवारी पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान हिंगोणे गावाजवळील बोरी नदीपात्रात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पाच विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच एमएच-१९ सीजे-०७७५ क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉली अशा एकूण सहा वाहनांमधून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ सर्व वाहने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली.
कारवाईत योगेश नामदेव भोई (रा. रुबजीनगर), प्रविण सुधाकर सोनवणे (रा. हिंगोणे खुर्द), राहुल छोटू ठाकरे (रा. रुबजीनगर), अर्जुन अशोक मालचे (रा. हिंगोणे खुर्द), सतीश मोहन बाविस्कर (रा. हिंगोणे खुर्द) आणि सोमनाथ मधुकर मोरे (रा. रुबजीनगर) या सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी चालकांसह संबंधित वाहनांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ट्रॅक्टरच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे. अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला.









