यावल तालुक्यातील घटना
यावल (प्रतिनिधी) :- येथील फैजपूर रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याने या घटनेत एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैय्यद खलील उर्फ सैय्यद हमीद (वय-४५, रा. डांगपुरा ता. यावल) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गुरूवारी ३० नोव्हेबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास यावल फैजपुर मार्गावरील सुहानी पेट्रोल पंपासमोरील परिसरात सैय्यद खलील सैय्यद हमिद हे आपल्या ताब्यातील (एमएच १९ सीसी ) बुलेट मोटरसायकलने यावलकडे येत होते. समोरून येणारी स्विफ्ट कार क्रमांक (एमएम ०४ डीएन २६२७) या वाहनाने यावलकडून फैजपुरकडे जात असतांना कारचालक मोहसीन खान मुक्तार खान याने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सैय्यद खलील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भुसावळ येथे खासगी रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.
याबाबत मयताचा पुतण्या सैय्यद तन्वीर सैय्यद शकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .