पतीसह पाच जणांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून बालविवाह आणि अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एक १७ वर्षीय मुलगी कायदेशीररित्या अल्पवयीन असल्याचे पूर्णपणे माहिती असतानाही, नातेवाईकांनी तिचा बेकायदेशीर बालविवाह लावून दिला. यानंतर तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले, ज्यातून पीडितेने एका बाळाला जन्म दिला आहे. या खळबळजनक प्रकरणात भडगाव पोलिसांनी पीडित मुलीच्या पतीसह तिचे सासू, सासरे आणि लग्न लावून देणाऱ्या मध्यस्थांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा गंभीर प्रकार भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे घडला. पीडित मुलगी ही १७ वर्षांची म्हणजेच कायदेशीररित्या अज्ञान असल्याचे माहिती असतानाही, संशयित आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह संशयिता सोबत लावून दिला होता. सन २०२५ पासून ते २३ मे २०२६ पावेतोच्या कालावधीत, संशयित पतीने पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा उठवत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या सततच्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिला एका बाळाला जन्म देण्यास भाग पाडण्यात आले.
पीडितेवर झालेल्या या अन्यायाची दाद मागण्यासाठी अखेर पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पारोळा पोलिसांनी शून्य (००/२०२६) क्रमांकाने गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी कागदपत्रे भडगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केली. त्यानुसार २४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजून १ मिनिटांनी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६५(१) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) चे कलम ४, ५(j)(२), ५(i), ६, ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी संशयित पती, सासरे, सासू (तिन्ही रा. ता. भडगाव) आणि विवाह जुळवून आणणारे मध्यस्थ श्री.सौ.मोरे (दोन्ही रा. ता. पारोळा) अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप बा. एकशिंगे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे भडगाव आणि पारोळा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.









