धरणगाव तालुक्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमृत अर्जुन पाटील (वय-४९,रा. बांभोरी बुद्रुक ता. धरणगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अमृत पाटील हे त्यांचे बांभोरी शिवारातील शेत गट नंबर १०७ मधील शेतातील विहिरीजवळ पाणी घेण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा पाय घसरल्याने ते विहिरीत पडले. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढत धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याप्रकरणी शनिवारी धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भातील पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खुशाल पाटील करीत आहे.