विरोधातील तिन्ही उमेदवारांची माघार; मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर भाजप उमेदवारही रिंगणाबाहेर
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपचे प्रभाकर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी महायुतीतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोड घडली. महायुतीचा युतीधर्म पाळण्याच्या दृष्टीने भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याची माहिती आहे. त्यानुसार जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही माघार घेतली.
विरोधातील तिन्ही उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील समन्वय आणि राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.









