पाझर तलावाच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी बनावट शिक्के, लेटरहेडचा वापर; फळझाडांची संख्याही वाढवल्याचा आरोप
जळगाव (प्रतिनिधी):- पिंपळगाव बुद्रूक व अटलगव्हाण येथील पाझर तलावासाठी संपादीत जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ६३ कोटी रुपयांचा दावा दाखल केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अॅड. किशोर बाबुराव पाटील यांच्यासह १७ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात बनावट शिक्के, लेटरहेड वापरण्यासोबतच फळझाडांची संख्या वाढवून दाखविल्याचेही चौकशीत समोर आले आहे.


पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक आणि अटलगव्हाण येथील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावाच्या कामासाठी संपादीत करण्यात आली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी संबंधितांनी न्यायालयात ६३ कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. मात्र, या दाव्यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि इतर कागदपत्रांचा वापर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाने केलेल्या चौकशीत संयुक्त मोजणी व मूळ निवाड्यात नसलेली तब्बल ५० आंब्याची झाडे नोंदीत वाढवून दाखविल्याचे समोर आले आहे. स्थळ निरीक्षण नोंदवहीत काळ्या पेनाने बेकायदेशीररीत्या नोंदी वाढविल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रविवारी रात्री उशिरापर्यंत विविध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात अँड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, जळगाव) यांच्यासह पिंपळगाव बुद्रूक येथील भगवान माणिक ठाकरे, मिश्रीलाल हिराचंद तेली, गोविंद हिराचंद तेली, प्रकाश हिराचंद तेली, गेंदिलाल हिराचंद तेली, चंद्राबाई लक्ष्मण तेली, सुमनबाई नारायण तेली, सीताराम शिवलाल तेली, गंगीलाल हिराचंद तेली, चिंधाबाई हिराचंद तेली, नामदेव नारायण तेली, हिराचंद नारायण तेली, शहादू नारायण तेली, शिवलाल नारायण तेली, रवींद्र मधुकर नाईक आणि ईश्वर रघुनाथ पाटील यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महसूल विभागाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठा आर्थिक दावा करण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.









