कोविडमुळे गुंतागुंतीच्या परिस्थितीवर यशस्वी मात

जळगाव (प्रतिनिधी) – येथील एका आठ वर्षाच्या मुलीचा करोना आजाराच्या गुंतागुंतीमुळे जीव धोक्यात आला होता. मात्र येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय शास्त्री व डॉ. अविनाश भोसले यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तज्ञांचा सल्ला घेत मुलीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
एक जळगाव तालुक्यातील ८ वर्षांची मुलगी डॉ. अजय शास्त्री यांच्या अंकुर मुलांचे हॉस्पिटल येथे उपचार घ्यायला आली होती. निदान केल्यावर लक्षात आले कि, कोविडमुळे झालेल्या गुंतागुंतीने तिची प्रकृती गंभीर होत आहे. तत्काळ तिला डॉ. शास्त्री यांनी चिरायू हॉस्पिटल येथे भरती केले. तिचा रक्तदाब कमी झालेला होता. हृदयाचे स्नायू आजारामुळे कमकुवत झाले होते. रक्त गोठण्याच्या पद्धतीतही अडचण झालेली होती. अशा परिस्थितीत तिच्यावर चिरायूतील सर्व डॉक्टर्सनी कठोर मेहनत घेऊन तिला मृत्यूच्या मुखातून बाहेर काढले. डॉ अविनाश भोसले, डॉ सारिका सुरवाडे, डॉ सारिका पाटील, डॉ स्वप्नील दसोरे, डॉ प्रवीण बोदडे, डॉ महेंद्र पाटील, डॉ मृणालिनी पाटील यांनी मुलीवर यशस्वी उपचार केले.

संपूर्ण जगाचा आढावा घेतला असता असे आढळले आहे की, प्रत्येक देशात लहान मुलांमध्ये कोव्हीडचे रुग्ण हे त्या देशातील प्रौढ लोकांच्या कोविड साथरोगापेक्षा काही आठवड्यानंतर आढळले आहेत. त्यामुळे आपल्या परिसरात असे रुग्ण आढळतील याची पूर्व तयारी म्हणून, त्यानुसार चिरायू हॉस्पिटल च्या टीम ने सर्व उपलब्ध वेबिनार द्वारे मिळालेले अनुभवाचे सारांश सर्व बालरोगतज्ज्ञ डॉक्टर्सना झूम मीटिंग घेऊन सांगितले होते. आजार नवीन असून आणि उपलब्ध केसेस कमी असल्यामुळे असे रुग्ण उपचार करतांना बऱ्याच अडचणी येतील याची माहिती सर्व डॉक्टर्सना दिली गेली होती.
तसेच आठ वर्षांच्या बालिकेच्या प्रकरणात उपचारांमध्ये आलेल्या अडचणींना पार पाडत चिरायू हॉस्पिटलच्या स्टाफने या दुर्मिळ आजारावर मात केली. याबद्दल रुग्णाच्या गावातील लोक डॉक्टरांचे आभार व्यक्त करीत आहेत. लहान मुलांना कोव्हीडची लागण होत नाही. शिवाय झाली तरी त्यात लक्षण फारच किरकोळ असतात आणि त्यात लहान मूल अत्यवस्थ परिस्थितीत जात नाही असा गैरसमज समाजात आहे. त्यामुळे, बालरोगतज्ज्ञ जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना कोव्हीडची तपासणी करायला सांगतात तेव्हा साफ नकार दिला जातो. अत्यवस्थ झालेले बहुतांश रुग्ण हे निदान आणि उपचार पद्धती मध्ये उशीर झालेले असतात. त्यामुळे जळगाव बालरोगतज्ज्ञ संघटनेने लोकांना लक्षण आल्यावर डॉकटरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांनी सांगितल्याबरोबर कोविडची आणि संबंधित आजारामुळे झालेल्या शरीरातील इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी आवश्यक तपासण्या करून घ्याव्या असे आवाहन केले आहे.
करोनाने ग्रस्त झाल्याच्या तीन ते चार आठवड्यानंतर काही लहान मुलांमध्ये पुन्हा जोरात ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, डोकेदुखी व अंगदुखी होणे, रक्तदाब कमी झाल्याने सुस्त होणे, सोबत लिव्हर, किडनी किंवा मेंदूमध्ये ताप जाणे असे विविध प्रकारचे लक्षण दिसतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी योग्य खबरदारी प्रत्येक पालकांनी घ्यावी असे प्रतिपादन डॉ. अजय शास्त्री यांनी केले आहे. कारण योग्य वेळेत निदान व उपचार झाल्यास मृत्युदर अत्यंत कमी असतो मात्र उशीर झाल्यास तो मारक ठरतो.







