अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

अधिकारी-अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात; २ पिस्तूल-तलवार प्रकरणे, दारूबंदीच्या ९ व जुगाराच्या ५ कारवाया
अमळनेर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी तपासणी, संशयितांची चौकशी तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये १ SDPO, ७ अधिकारी व ६२ अंमलदार अमळनेर पोलीस ठाण्याकडील, तसेच १ अधिकारी व १० अंमलदार स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान आर्म्स ॲक्टअंतर्गत दोन कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये आर्म्स ॲक्ट ३/३५ अंतर्गत पिस्तूल प्रकरणी एक, तर आर्म्स ॲक्ट ४/२५ अंतर्गत तलवार प्रकरणी एक कारवाई करण्यात आली.
दारूबंदी कायद्यांतर्गत ९ कारवाया, तर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ५ कारवाया करण्यात आल्या. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ११३ इसमांची तपासणी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच २५ हिस्ट्रीशीटरची तपासणी करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ३२ इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली. याशिवाय कोटपा कायद्यांतर्गत ३, BNS कलम २८५ अंतर्गत ७, मोटार वाहन कायद्यांतर्गत ३६, तर MV Act ६६/१९२ अंतर्गत एका प्रकरणाची नोंद करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्हच्या ३ कारवाया, तसेच मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये बनावटीकरण केल्याप्रकरणी २ कारवाया करण्यात आल्या.
दरम्यान, ६ बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित १५ NBW वॉरंट, ६ BW वॉरंट आणि २१ समन्स बजावण्यात आले. शहरातील १६ हॉटेल व लॉजची तपासणी करण्यात आली. तसेच BNS कलम १२६/१२९ अन्वये २० आरोपींवर कारवाईची प्रक्रिया करण्यात आली.
या व्यापक कॉम्बिंग ऑपरेशनमुळे अमळनेर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांनी वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, आगामी काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.









