पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल शहर व परिसरात गुन्हेगारी टोळी तयार करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तिघांवर जळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये आदेश काढून टोळीतील तिघांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. आदेश मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर जाण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.


हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (वय १८, रा. नागोबा मंदिर, एरंडोल), पवन प्रकाश मराठे (वय १९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) आणि शुभम उर्फ झिंग्या दत्तात्रय पाटील (वय २५, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे.
या टोळीविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, जिवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे यासह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. तिघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून एरंडोल पोलिस ठाण्यात भा.ना.सु.सं. २०२३ चे कलम १२६ अन्वये स्वतंत्र प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये तिघांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.









