चार दिवसांपासून सुरु होते उपचार, भडगाव तालुक्यात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता सतीश साळुंखे यांचा महाराष्ट्रदिनी बुधवार दि. १ मे रोजी भडगाव तालुक्यातील वडजी गावाजवळ भीषण अपघात झाला होता. जळगावात खाजगी रुग्णालयात चार दिवसांपासूनची त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. रविवारी दि. ५ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे.
ललिता सतीश साळुंखे (वय ४८, रा. इंद्रप्रस्थ नगर, दूध फेडरेशन रोड, जळगाव) असे मयत मुख्याध्यापिकेचे नाव आहे. त्या जळगावात पती, २ मुले यांच्यासह राहत होत्या. त्यांचे पती सतीश साळुंखे हे वर्षभरापूर्वी खुबचंद सागरमल याच शाळेतून सेवानिवृत्त झाले आहे. तर मुलगा बंगळुरू व मुलगी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ललिता साळुंखे ह्या महाराष्ट्रदिनी दि. १ मे रोजी मुलगी संजना हिच्यासह भडगाव येथे कारने जात होते. भडगाव तालुक्यात दुपारी १२ वाजेच्या सुमारास वडजी गावाजवळ कार आली असता रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन ते चार वेळा उलटली आणि झाडावर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात ललिता साळुंखे ह्या जबर जखमी झाल्या. त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मुलगी संजना हि किरकोळ जखमी झाली. दरम्यान, चार दिवस ललिता यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. रविवारी दि. ५ मे रोजी दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पुढील कार्यवाहीसाठी त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, ललिता साळुंखे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना माहिती मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.