अमळनेर येथे बांधकाम साईटवरील धक्कादायक प्रकार; ॲट्रॉसिटीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) : कामाचे पैसे मागितल्याच्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील देवळी येथील आरबी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम साईटवर घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, धमकी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य राजेंद्र सोनवणे (वय २८, रा. प्रतापनगर मिल कंपाऊंड, अमळनेर) हे २२ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या दरम्यान देवळी येथील बांधकाम साईटवर काम करत होते. त्यावेळी संशयित आरोपी अनंत निकम (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) हा चारचाकी वाहनाने तेथे आला.
कामाच्या पैशांच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कमरेला लावलेला चाकू काढून फिर्यादीच्या छातीखाली वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या खिशातील १० हजार रुपये काढून घेतले तसेच पँटच्या खिशात असलेले ४० हजार रुपये काढण्याचाही प्रयत्न केला.
या वेळी साईटवर काम करणारे कलेश संजय यांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही आरोपीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३०९(६), ११५(२), ३५१(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम ३(१)(र), ३(१)(स), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








