नराधमविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ):- जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून एक संतापजनक आणि विकृत घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात एकटे पाहून शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्याने तिच्या अंगावर हात टाकत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विकृत मानसिकतेच्या या संशयित नराधमाविरुद्ध पीडित मुलीच्या धाडसी तक्रारीनंतर जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या कडक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर कॉलनी परिसराजवळील सप्तशृंगी कॉलनी भागात रविवारी, २४ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात असताना, परिसरातीलच संशयित आरोपीने तिला कोणत्यातरी बहाण्याने आपल्या घरी बोलावून घेतले. मुलगी घरात येताच या चवताळलेल्या नराधमाने तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श केला. आरोपीने पीडितेच्या मनास तीव्र लज्जा उत्पन्न होईल असे अयोग्य वर्तन आणि अश्लील कृत्य केले. या अचानक झालेल्या प्रसंगामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलीने नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट घर गाठून पालकांकडे रडत रडत आपबिती कथन केली.
अल्पवयीन मुलीसोबत घडलेला हा गंभीर प्रकार ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी वेळ न घालवता तातडीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून नराधमाविरुद्ध तक्रार दिली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांत संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करत आहेत. अशा विकृत गुन्हेगाराला पोलिसांनी कठोरात कठोर अद्दल घडवावी, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.









