चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव पोलिसांनी गस्त घालत असताना एका कारचा संशय आल्यानंतर त्याचा पाठलाग केला. कार थांबवून तपासणी केली असता, कारमध्ये १८ लाखांची अफूची बोंडे दिसून आली. हि बोन्डे जप्त केली असून संशयित चालक फरार झाला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन मालधक्क्याजवळ ही कारवाई केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव शहरचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आवाड हे रविवारी पहाटे गस्त करीत असतांना त्यांना शहरातील धुळे रोड महाविद्यालयाजवळ कार (क्रमांक एम.पी.०९ डब्यू.सी.१४८५) दिसली. त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वेगाने कार पळवली. पोलीस पथकाने पाठलाग सुरू केल्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ वाहन सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अफूची बोंडे आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या मोजणीत १ क्विंटल ८० किलो २४० ग्राम वजनाचे अफू बोंड जप्त करण्यात आले. याप्रकरणी कार चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.