सांगली ( प्रतिनिधी ) – किरकोळ वादातून चौघांनी शहरातील संजय नगरातील झेंडा चौकात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाच्या डोक्यात गॅसचा स्टोव्ह घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर मारेकऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. नितीन आनंदराव शिंदे (वय-३२, रा. संजयनगर, सांगली) असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती वरून, नितीन शिंदे संजयनगरमध्ये खेराडकर पेट्रोलपंपाजवळ झेंडा चौकात राहण्यास होता. त्याची मालवाहतूक गाडी असून तो व्यवसाय करत होता. नितीनच्या वडिलांची वखार आहे. नितीन कामावरून परतल्यानंतर काल रविवारी सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्यांच्यात व इतर चार जणांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यावादातून संशयितांना थेट गॅसचा स्टोव्हच डोक्यात टाकून निर्घृण हत्या केली. एकाच घाव वर्मीत पडल्याने संशयित आरोपी हे घटनास्थळाहून पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस उपअधिक्षक आण्णसाहेब जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्याचे काम सुरू आहे.