जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भाजीपाला मार्केट येथे उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) यांच्या पथकाने सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३. ३० वाजता चक्री सोरट खेळणाऱ्यांवर छापा टाकला. यावेळी सोरट खेळणारे पळून गेले. मात्र सोरट जुगार अड्डा चालविणारे तिघे जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गावित यांनी परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी, पोकॉ गोपाळ पाटील, पोकॉ सचिन साळुंखे यांना खात्री करण्यास सांगितले. हे पथक कँवर नगर पोलीस चौकी येथे गेले. त्याठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, सचिन पाटील, योगेश बारी यांच्यासह सिंधी कॉलनी येथील भाजीपाला मार्केट येथे गेले. तेथील एक दुकानात पडदा लावून काही इसम बसलेले दिसले. हे इसम हे टि.व्ही. स्क्रीन वर गोल चकरीसारखे माऊस च्या आधारे ऑपरेट करोत असतांना दिसले. त्यांच्या समोर ४ ते ५ इसम हे हातात पैसे घेवुन उभे दिसले.
त्याचवेळी पोलिसांनी दुपारी ३. ३० वाजता छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागल्याने पैसे घेवून उभे असलेले इसम सदर ठिकाणाहून पळून गेले. टि.व्ही. स्कीन ऑपरेट करणारे तिन्ही इसमांना पोलिसांनी जागीच पंचासमक्ष पकडले. संतोष नानकराम रामचंदाणी (वय ३२ वर्ष, रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव), वसीम शहा शब्बीर शहा (वय ३२ वर्ष, रा. बिलाल चौक, तांबापुरा), निलेश दिनेश सरपटे (वय ३३ वर्ष, रा. नवल कॉलनी, सिंधी कॉलनी) असे तिघा संशयितांचे नाव आहे. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोकॉ सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघंही संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.